डाउनलोड प्रस्तुति
प्रस्तुति लोड हो रही है। कृपया प्रतीक्षा करें।
1
द्वितीय वर्ष कला विषय : कादंबरी - एक साहित्यप्रकार (सत्र ३)
सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे द्वितीय वर्ष कला (सत्र ३) विषय : कादंबरी - एक साहित्यप्रकार (अभ्यासपत्रिका II) दिवे गेलेले दिवस (रंगनाथ पठारे) घटक : तीन डॉ. प्रज्ञा दया पवार
2
लेखक आणि साहित्यकृती रंगनाथ पठारे
3
रंगनाथ पठारे यांची साहित्यसंपदा
रंगनाथ पठारे हे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक आहेत. कथा, कादंबरी, वैचारिक लेखन, समीक्षा व अनुवाद असे विविध साहित्यप्रकार निर्माण करून त्यांनी स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण मुद्रा मराठी साहित्यात उमटवली आहे. त्यांच्या साहित्यात प्रामुख्याने ‘अनुभव विकणे आहे’, ‘शंखातला माणूस’, ‘स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग’, ‘चित्रमय चतकोर’, ‘तीव्र कोमल दुःखाचे प्रकरण’, ‘ईश्वर मृतात्म्यास शांती देवो’ या कथासंग्रहांचा समावेश होतो. त्यांनी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असे कादंबरीलेखनही केलेले आहे. ‘दिवे गेलेले दिवस’, ‘रथ’, ‘चक्रव्यूह’, ‘हारण’, ‘टोकदार सावलीचे वर्तमान’, ‘ताम्रपट’, दुःखाचे श्वापद’, ‘नामुष्कीचे स्वगत’, ‘त्रिधा’, ‘कुंठेचा लोलक’ आणि ‘चौकातील अरण्यरूदन’ या त्यांच्या कादंबर्यांनी मराठी कादंबरीच्या प्रवाहात मोलाची भर घातली आहे.
4
रंगनाथ पठारे यांची साहित्यसंपदा
रंगनाथ पठारे यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनाद्वारे विविध विषयांवर प्रकाश टाकला आहे. भारतातील आणीबाणी आणि राजकीय प्रश्न, महाराष्ट्राचे राजकारण, मराठीतील साहित्यिक चळवळी, शिक्षणक्षेत्रातील अंदाधुंदी, समाजातील वेगवेगळ्या समूहांचे अनेकस्तरीय जगणे आणि त्यांच्या अंतर्विश्वाचा शोध, पौराणिक मिथकांची समकालीन पटावरची मांडणी, जागतिकीकरणानंतर निर्माण होणारा मध्यमवर्गीय जीवनातला कोलाहल तसेच विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे एका बाजूला माणसाच्या जगण्यात निर्माण झालेल्या विविधांगी सोयीसुविधा आणि तरीही त्यातून उद्भवणारी दुःखं अशा आशयसूत्रांना रंगनाथ पठारे यांनी त्यांच्या कथनात्म लेखनातून सातत्याने अधोरेखित केले आहे.
5
‘दिवे गेलेले दिवस’ कादंबरीविषयी
‘दिवे गेलेले दिवस’ ही लेखक रंगनाथ पठारे यांची पहिलीच कादंबरी आहे. या कादंबरीत १९७५चा आणीबाणीचा कालखंड आला आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतात आणीबाणी ही एक महत्त्वाची उलथापालथ करणारी राजकीय घटना निर्माण झाली. त्या घटनेचा सर्जनशील अन्वयार्थ लावावा असे लेखकाला वाटले, हेच मुळी लेखकाच्या ठायी असलेल्या संवेदनशीलतेचे, जबाबदारीचे आणि समकालीन घडामोडींबद्दल त्यांना वाटणार्या आस्थेचे प्रत्यंतर आहे. या कादंबरीसाठी श्री. पठारे यांना महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार (१९८७) मिळाला आहे.
6
कादंबरीतील महत्त्वाचे घटना-प्रसंग
१) निवेदकाचे फोन प्रकरण, २) निवेदकाला मित्रांनी धीर देणे, ३) एका देखण्या बाईचे निवेदकाच्या घरी आकस्मिकरित्या येणे, ४) तिची खरी कहाणी निवेदकाला समजणे, ५) आणीबाणीचे शिस्तपर्व लागू होणे, ६) मिस मेहताबचे येणे, ७) कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया शिबीरे प्रसंग, ८) कारखान्यावर मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी ठेवलेली जेवणावळ, ९) मिसेस देवगिरीकर यांच्या कविता, १०) आमदार भास्करराव बेंडे यांच्या स्विमींग पुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम, ११) वोटबँकेसाठी युवा संघटनेची स्थापना, १२) आणीबाणीनंतरच्या निवडणुका, १३) म्हातारबा नागरगोजेंना झालेली मारहाण.
7
कादंबरीतील निवेदक ‘दिवे गेलेले दिवस’मधील निवेदक-नायक हा प्राध्यापक आहे. कुणाच्या अध्यातमध्यात नसलेला, कॉलेजमध्ये शिकवणे आणि कौटुंबिक बाबींकडे लक्ष देण्यापलीकडे तो फारसा समाजजीवनामध्ये मिसळत नाही. पण, आणीबाणीच्या काळात त्याच्यातील सुप्त शक्ती कशी जागृत होते याचे दर्शन या व्यक्तिरेखेच्या आधारे कादंबरीकाराने घडवले आहे. सुरुवातीला सगळ्या घटनांकडे तटस्थपणे पाहणारा हा निवेदक हळूहळू आणीबाणीच्या शिस्तपर्वाविरोधात काम करू लागतो. या अर्थाने ही प्रवाही, विकास पावणारी व्यक्तिरेखा आहे. निवेदकाचे व्यक्तिमत्त्व कादंबरीच्या आशयाशी एकरूप झालेले दिसते. त्याच्या मानसिक पातळीवरील उलाढालीतून त्याचे व्यक्तिमत्त्व उभे राहते. स्वतःच्या मर्यादांचे भान आणि आत्मसमर्थनाऐवजी प्रांजळ कबुली या वृत्तीमुळे निवेदकाचा प्रामाणिकपणा दिसून येतो.
8
कादंबरीतील महत्त्वाच्या स्त्री-व्यक्तिरेखा
‘दिवे गेलेले दिवस’ या कादंबरीत मुख्य भूमिका बजावणार्या एकूण ४ स्त्री-व्यक्तिरेखा असून शिक्षण, जात, आवडीचे क्षेत्र तसेच परिसरविषयक पार्श्वभूमी याबाबतीत त्यांच्यात विविधता आहे. मिसेस देवगिरीकर, देखणी बाई, मिस मेहताब आणि निवेदकाची बायको या त्या चार व्यक्तिरेखा आहेत. मिसेस देवगिरीकर या एक ब्राह्मण जातीतील उच्च विद्याविभूषित स्त्री आहेत. सामाजिक घडामोडींबाबत त्या जागृत असून आणीबाणीमुळे त्या अस्वस्थ झालेल्या आहेत. समाजकार्य करणे, साहित्यिक चर्चांच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे, काव्य संमेलन भरवणे, ज्वलंत विषयांवर चर्चासत्रे घडवून आणणे, कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणे हे त्यांना आवडते. देशात सर्वत्र भीतीचे, असुरक्षिततेचे वातावरण असल्याने त्या भेदरलेल्या आहेत. एरवी कणखरपणाचा आव आणणार्या या बाई दांभिकपणाने आपली कातडी वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसतात.
9
कादंबरीतील महत्त्वाच्या स्त्री-व्यक्तिरेखा
देखणी बाई ‘दिवे गेलेले दिवस’ या कादंबरीतील हे दुसरे स्त्रीपात्र होय. या स्त्री-व्यक्तिरेखेला नाव नाही. निवेदक तिचा उल्लेख देखणी बाई असाच करतो. आणीबाणीच्या काळातील शिस्तपर्वाची अमानुषता ठळक करण्यासाठी कादंबरीकाराने हे पात्र निर्माण केले आहे. तिच्या नवर्याला भरपूर पगाराची नोकरी असून त्यांची सांपत्तिक स्थिती उत्तम आहे. त्यांना अपत्य नाही. याशिवाय तिचा दिर आणीबाणी विरोधातील क्रांतिकारी चळवळीत सक्रीय असून त्याच्यावर राज्यकर्त्याच्या खूनाच्या कटाचा आरोप असतो. तो हाती लागत नाही याचा राग म्हणून या बाईच्या नवर्याचा शासनयंत्रणा अमानुष छळ करते. अखेर हा छळ असह्य होऊन तो आत्महत्या करतो. पतीच्या आत्महत्येमुळे या बाईंच्या मानसिक स्थितीचे संतुलन बिघडते व या यंत्रणेचा नायनाट करा, यंत्रणेविरुद्ध आवाज उठवा असे ती प्रत्येकाला सांगत सुटते.
10
कादंबरीतील महत्त्वाच्या पुरुष-व्यक्तिरेखा
प्राचार्य ‘दिवे गेलेले दिवस’ या कादंबरीतील प्राचार्य हे एक महत्त्वाचे पात्र आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते प्राचार्य म्हणून काम पाहत असतात. त्यामुळे महाविद्यालयाचे हित हे त्यांच्यासाठी सर्वोच्च आहे. साहजिकच स्टाफमधील सर्व कर्मचार्यांशी ते समजूतदारपणे वागतात. उच्चवर्णीय असूनही बहुजनांच्या शिक्षणासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच कुठलीही फी न घेता ‘कमवा व शिका’ या योजनेअंतर्गत ते विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करतात. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार ते करत नाहीत व दुसर्यालाही करू देत नाहीत. या कारणामुळे ते संस्थाचालक असलेल्या आमदार भास्करराव बेंडे यांच्या रोषास पात्र ठरतात. आपल्या संस्थेसाठी, महाविद्यालयासाठी खूप मेहनत घेणारे असे आदर्शवादी विचारांचे हे पात्र आहे.
11
कादंबरीतील महत्त्वाच्या पुरुष-व्यक्तिरेखा
आमदार भास्करराव बेंडे कादंबरीत सर्वाधिक महत्त्वाची राजकीय व्यक्तिरेखा आमदार भास्करराव बेंडे ही आहे. स्विमींग पुलाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी केलेल्या भाषणावरून ते अडाणी असल्याचे लक्षात येते. भास्करराव पहिलवान आहेत. कुस्तीच्या खेळात त्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे. ग्रामीण भागात शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी महाविद्यालय काढले आहे. पण भ्रष्टाचारापासून दूर राहणार्या प्राचार्यांशी मात्र त्यांचे अजिबात जमत नाही. विधानसभेचे सत्ताधारी काँग्रेसचे ते आमदार आहेत. आपल्याला निवडणुकीसाठी कोण पैसा देईल, कोण आपल्या फायद्याचा आहे, आपल्या विरोधकाला आपल्याकडे कसे वळवायचे याचे कौशल्य प्राप्त असलेली ही एक बिलंदर व धोरणी व्यक्तिरेखा आहे. भ्रष्ट आणि गुंड प्रवृत्तीची असलेली ही भास्कररावांची व्यक्तिरेखा म्हणजे समकालीन राजकीय प्रवृत्तीच ठरते.
12
कादंबरीची भाषाशैली या कादंबरीतील निवेदन पद्धती प्रथमपुरुषी आहे. पठारे यांनी या कादंबरीत ग्रामीण भाषेचा प्रभावी वापर केलेला आहे. त्याचबरोबर इंग्रजी भाषेचेही उपयोजन केलेले आहे. पठारे यांची तीव्र अशी उपहासात्मक लेखनशैली या कादंबरीतून जाणवते. संवादात्मकता आणि काव्यात्मकता या दोन लेखनशैलींचे उपयोजन लेखकाने अत्यंत समर्थपणे केल्याचे दिसून येते. एकूणच रंगनाथ पठारे यांनी या कादंबरीमध्ये संवादात्मकता, काव्यात्मकता, ग्रामीण व प्रमाण भाषांचा उपयोग, तीव्र उपहासात्मकता, मिश्रित भाषा तसेच वैविध्यपूर्ण प्रतिमांचा वापर केलेला दिसतो. प्रस्तुत कादंबरीची निवेदनशैली ही प्रमाण भाषेतील आहे.
13
शीर्षकाची समर्पकता १९७६सालच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेला आणीबाणीचा कालखंड हा पार्श्वभूमी म्हणून या कादंबरीत आला आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील आणीबाणी ही भारतातील राजकीय, सामाजिक उलथापालथ करणारी सर्वात महत्त्वाची घटना आहे. या घटनेचा मानवी जीवनावर होणारा परिणाम हा या कादंबरीचा खरा विषय आहे. त्यामुळेच ‘दिवे गेलेले दिवस’ हे शीर्षक सूचक आहे. आणीबाणीच्या काळातील मानवी जीवनातील अंधारमय अवस्था यातून प्रतिकात्मकरित्या व्यक्त होते. भारतातील आणीबाणीचा काळ हा भीतीचा, असुरक्षिततेचा, दडपणाचा, संशयाचा, अस्थिरतेचा काळ होता. अशा या दिवसात व्यक्तीचे स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सारेच धोक्यात आले होते. त्यामुळे संवेदनशील, विचारी मनाची घुसमट होत होती. ‘दिवे गेलेले दिवस’ या कादंबरीतून दिवे गेलेल्या व अंधारमय दिवसाचे यथातथ्य चित्र वाचकांसमोर उभे राहते. या दृष्टीने ‘दिवे गेलेले दिवस’ हे कादंबरीचे शीर्षक समर्पक ठरते.
14
स्वाध्याय ‘दिवे गेलेले दिवस’ या कादंबरीत मांडले गेलेले राजकीय आशयसूत्र सविस्तर लिहा. शिस्तपर्वाचा प्रत्यय निवेदकाला कसा येतो ते ‘दिवे गेलेले दिवस’ या कादंबरीच्या संदर्भात स्पष्ट करा. ‘दिवे गेलेले दिवस’ या कादंबरीतील स्त्री-व्यक्तिरेखांचा परामर्श घ्या. ‘दिवे गेलेले दिवस’ या कादंबरीचा निवेदक मध्यमवर्गीय असला तरी तो संवेदनशून्य नक्कीच नाही. या विधानाची सविस्तर चर्चा करा. टिपा लिहा. १. शीर्षकाची समर्पकता. २. प्राचार्य – व्यक्तिरेखा
15
आणि स्वाध्याय पूर्ण व्हावा म्हणून
धन्यवाद…!! आणि स्वाध्याय पूर्ण व्हावा म्हणून शुभेच्छा...!!
इसी तरह की प्रस्तुतियाँ
© 2024 SlidePlayer.in Inc.
All rights reserved.